सौ. लतिका व दत्तू यादव राज्यस्तरीय आदर्श माता-पिता पुरस्काराने सन्मानीत

आई-वडिलांइतके उत्तम संस्कारपीठ नाही ः मिलिंद जोशी
कोंडबावी (ता. माळशिरस) येथील सौ. लतिका व दत्तू यादव राज्यस्तरीय आदर्श माता-पिता पुरस्काराने शनिवार (दि. २५) रोजी सन्मानीत झाले. पुणेे येथील सुसंगत फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात यशस्वी असलेल्या २९ नामवंत व्यक्तींच्या आई-वडीलांचा राज्यस्तरीय आदर्श माता-पिता पुरस्कार देऊन सन्मानीत केले. हा समारंभ एस.एम. जोशी सभागृह नवी पेठ पुणे येथे पार पडला. या समारंभाप्रसंगी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, उद्योजक राहुल भोसले, प्रकाश चव्हाण, नजीर तांबाेळी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर न्हाळदे, सचिव संगिता न्हाळदे, विश्वस्त धोंडीराम गडदे, विजयकुमार ठुबे, फाउंडेशनचे सर्व सदस्य तसेच प्रकाशक रुपाली अवचरे, निखिल लंभाते, अादी उपस्थित होते.
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, आई-वडीलांइतके उत्तम संस्कारपीठ अन्य दुसरे कुठलेही नाही. आजची स्थिती पाहिता केवळ एकाच अपत्यामुळे कुटुंबामध्ये प्रेम आणि अपेक्षा यांचा कडेलोट झाल्याचे दिसून येते. प्रायव्हसी नावाच्या संकल्पनेचाही कडेलोट झाल्याचे दिसून येते. त्यामुळे अगदी मुलांच्या खोलीत प्रवेश करताना दार वाजवून मुलांना भेटावे लागते अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
सत्कारार्थी माता-पित्यांनी घडवल्यामुळे मुले यशस्वी होतात, ती समृद्ध होतात. मुलांची अंगभूत क्षमता ओळखून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आई-वडीलांचं झोकून देणं हेच खरं प्रेम असतं. या सर्व कुटुंबांमध्ये एक समान धागा तो म्हणजे, घरांमध्ये आर्थिक समृद्धी नसली तरी संस्कारांची समृद्धी त्यांच्याकडे असल्याचे दिसून येते. असे प्रतिपादनही महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे मुख्य मार्गदर्शक आणि साधना ट्रस्टचे अध्यक्ष विवेक सावंत यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक फाउंडेशनचे अध्यक्ष सुधाकर न्हाळदे यांनी तर सूत्रसंचालन जागृती कुलकर्णी आणि माणिक सोनवलकर यांनी केले. आभार धोंडीराम गडदे यांनी मानले.