अकलूज येथे ‘सहकार महर्षी केसरी’ बैलगाडा शर्यत

अकलूज : श्री विजय गणेशोत्सव मंडळ पब्लिक ट्रस्टच्यावतीने सहकार महर्षी केसरी खुली बैलगाडी शर्यत शुक्रवार दि. ७ फेब्रुवारी रोजी क्रीडा संकुलासमोरील पटांगणात होणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील यांनी दिली.
सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त बैलगाडा शर्यतीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेत मदनसिंह मोहिते-पाटील यांनी माहिती दिली. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व ट्रस्टी अॅड. नितीन खराडे, तुकाराम जाधव, चंद्रकांत कुंभार, संतोष माने, श्रीकांत राऊत, वसुंधरा देवडीकर, शाहिनाज शेख उपस्थित होते. या शर्यतीत ५०० पेक्षा अधिक बैलगाड्या सहभागी होतील. शर्यतीत प्रथम १ लाख ५० हजार व चषक, द्वितीय १ लाख १० हजार, तिसरे बक्षीस ७५ हजार, चौथे ६० हजार, पाचवे ५० हजार, सहावे ३० हजार, सातवे २० हजार, आठवे १० हजार व चषक, सेमी फायनलमध्ये दोन नंबर उतरणाऱ्या गाडीस योग्य बक्षीस दिले जाणार आहे. त्याचबरोबर सहभागाचे प्रशस्तिपत्रक देण्यात येणार आहे.