उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं शिर्डीत महत्वाचं विधान…येणारा काळ


विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर आता महायुतीमधील सर्वच पक्ष आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचं शिर्डीत अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य सस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मार्गदर्शन केलं. तसेच कामाला लागण्याच्या सूचनाही कार्यकर्त्यांना वरिष्ठ नेत्यांनी दिल्या. या अधिवेशनात आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पक्षाच्या नेत्यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी बोलताना अजित पवार यांनी एक महत्वाचं आणि सूचक विधान केलं. “येणारा काळ राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा असला पाहिजे, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे”, असं सूचक भाष्य अजित पवारांनी केलं.अजित पवार काय म्हणाले?“पक्षाच्या पुढील वाटचालीच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत शिबीर आयोजित करण्यात आलं. खरं तर सर्व नेत्यांनी सकाळी कामाला लवकर सुरुवात केली पाहिजे. सर्वांनी याची नोंद घेतली पाहिजे. मला असं वाटायचं की मीच सकाळी फार लवकर कामाला सुरुवात करतो. आता परवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुतीच्या सर्व आमदारांशी संवाद साधला. त्यावेळी मोदींनी त्यांचे अनुभव सांगितले. तेव्हा आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही सकाळी किती वाजता उठता? तेव्हा ते म्हणाले मी फक्त साडेतीन तास झोपतो, पहाटे साडेतीन वाजता उठतो. त्यानंतर दररोज योगा करतो, असं त्यांनी सांगितलं”, असं अजित पवार म्हणाले