महाराष्ट्र

अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीचं षडयंत्र कुणी रचलं? भुजबळांचं मोठं विधान

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचं दोन दिवसांपूर्वी शिर्डीत अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनात बोलताना मंत्री धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या २०१९ च्या पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख करत पहाटेचा शपथविधी हा षडयंत्राचा भाग होता, असा खळबळजनक दावा धनंजय मुंडे यांनी केला. त्यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. धनंजय मुंडेंच्या या विधानावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देत काही सवाल उपस्थित केले आहेत. ‘अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीचं षडयंत्र कुणी रचलं? हे षडयंत्र राष्ट्रवादीतील लोकांनी रचलं की भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी रचलं? याची माहिती नाही. मात्र, त्यावेळी शरद पवार आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात वाद झाला होता, असं म्हणत तेव्हा नेमकं काय घडलं होतं? हे भुजबळांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

छगन भुजबळ काय म्हणाले?

राज्य सरकारने नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या निर्णयाला स्थगिती दिली. यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले, “काहीतरी अडचणी निर्माण झाल्या असतील त्यामुळे नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या निर्णयाला स्थगिती दिली असेल. सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोस दौऱ्यावर आहेत. दावोसमध्ये जागतिक परिषद असते त्या परिषदेतून उद्योग आपल्या राज्यात आणण्यासाठी ते तिकडे गेलेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरून आल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्याशी चर्चा करतील आणि त्यावर नक्कीच मार्ग काढतील”, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं.

धनंजय मुंडेंच्या विधानाबाबत भुजबळ काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनात धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांच्या पहाटेचा शपथविधी हा षडयंत्राचा भाग होता, असं मोठं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. भुजबळ म्हणाले, “धनंजय मुंडे यांचं भाषण झालं तेव्हा मी त्या ठिकाणी नव्हतो. मात्र, मी माध्यमातून थोडसं ऐकलं. धनंजय मुंडेंनी म्हटलं की पहाटेचा शपथविधी हे एक षडयंत्र होतं. जर षडयंत्र होतं तर ते षडयंत्र कोणी रचलं? मग उद्धव ठाकरे तर षडयंत्र रचू शकत नाहीत. काँग्रेसचेही नेते षडयंत्र रचू शकत नाही. मग षडयंत्र कोणी रचलं?”, असा सवाल छगन भुजबळ यांनी केला.

भुजबळ पुढे म्हणाले, “मग हे षडयंत्र राष्ट्रवादीतील लोकांनी रचलं की भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी रचलं? याची काही माहिती नाही. मात्र, मला एवढं आठवतं की २०१९ मध्ये बैठका सुरु होत्या. त्यामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेत्यांमध्ये बैठका सुरु होत्या. तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि शरद पवारांचा थोडा वाद झाला होता, तेव्हा शरद पवार रागाने निघून गेले होते. पण त्यानंतर प्रमुख नेत्यांच्या बैठका सुरुच होत्या. त्याप्रमाणे ८ वाजता एका ठिकाणी बैठक बोलावली गेली होती. मात्र, त्या बैठकीला अजित पवार हे उपस्थित नव्हते”, असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं.

“तेव्हा अजित पवार बैठकीला उपस्थित नव्हते तेव्हा आम्हाला वाटलं की ते कुठे काही कामात अडकले असतील. मात्र, त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी टिव्ही लावली आणि लक्षात आलं की अजित पवार यांचा शपधविधी झाला आहे. त्यानंतर मी तातडीने शरद पवारांकडे गेलो, तेव्हा शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला आणि सांगितलं होतं की आपण मजबुतीने उभं राहिलं पाहिजे आणि जे काही झालं आहे ते होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी कामाला लागलं पाहिजे असं शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं”, असं छगन भुजबळांनी म्हटलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!